नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला
महाराज्य टाईम्स (३० नोव्हेंबर) राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. नामनिर्देशनपत्र रद्द/स्वीकृतीवरील निर्णयाविरोधातील अपिलांचा निकाल उशिरा लागल्याने, तसेच काही प्रकरणांत निकाल न मिळताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याचे आढळून आल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणच्या निवडणुका स्थगित करून नवीन कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, छाननी प्रक्रियेत बाद ठरलेल्या किंवा व्यथित झालेल्या उमेदवारांना जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुदत होती. नियमानुसार, या अपीलांवरील निकाल 22 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागणे अपेक्षित होते. जेणेकरून, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संबंधित उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी (नियम 17 (1) (ब) नुसार) तीन दिवसांचा वैधानिक कालावधी मिळेल आणि त्यानंतर 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप करता येईल.
मात्र, अनेक ठिकाणी जिल्हा न्यायालयाचे निकाल 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर आले. असे असतानाही काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना माघारीसाठी आवश्यक वेळ न देताच 26 नोव्हेंबरला घाईघाईने चिन्ह वाटप केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. ही कार्यवाही नियमबाह्य ठरत असल्याने आयोगाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
आयोगाच्या आदेशानुसार खालील दोन प्रकारच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
1. सदस्य पद : ज्या वॉर्डमध्ये किंवा जागेसाठी अपील दाखल
होते आणि त्याचा निकाल २३ नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर आला आहे, फक्त त्या विशिष्ट जागेची निवडणूक स्थगित
. सदस्य पद : ज्या वॉर्डमध्ये किंवा जागेसाठी अपील दाखल
होते आणि त्याचा निकाल २३ नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर आला आहे, फक्त त्या विशिष्ट जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
2. अध्यक्ष पद : जर अपीलाचा विषय अध्यक्षपदाशी संबंधित
असेल आणि तिथे उशिरा निकाल लागला असेल, तर त्या संपूर्ण नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, आपल्या जिल्ह्यातील अशा प्रकरणांची तातडीने माहिती संकलित करावी. ज्या ठिकाणी २३ नोव्हेंबरनंतर न्यायालयाचे आदेश आले आहेत, तिथली निवडणूक प्रक्रिया थांबवून नव्याने सुधारित कार्यक्रम राबवावा. यासाठी आयोगाने सुधारित वेळापत्रक (परिशिष्ट-1) जारी केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा जागांची यादी आयोगाला विनाविलंब सादर करायची आहे.
दरम्यान, न्यायालयीन अपिलांमुळे किंवा नामनिर्देशन प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रभावित झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जारी करण्यात आला आहे.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी 4 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करावयाचा आहे.
उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंत (दुपारी 03.00 वाजेपर्यंत) मुदत दिली आहे
त्यानंतर 11 डिसेंबर रोजी आवश्यकतेनुसार निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
आवश्यकता भासल्यास मतदानाची तारीख 20 डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली असून मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.
मतमोजणीची प्रक्रिया 21 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होणार.
निकाल 23 डिसेंबर 2025 पूर्वी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती हा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमातील कलम 19 नुसार जाहीर करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा