कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?
महाराज्य टाईम्स: बारामतीचे विकास पुरुष म्हणून जनतेने स्व.अजितदादांना अगदी मनापासून शेवटच्या माणसाने उपाधी दिली होती. आपल्या ह्रदयात एक आदराची जागा निर्माण केली होती. परंतू स्व.अजितदादांच्या आकस्मिक अपघाती निधनानंतर बारामती पोरकी झाली त्याच प्रमाणें विविध प्रशासनावरील अंकुश व वचक सुद्धा संपला असे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे.
स्व.अजितदादांची कामाची पद्धत अत्यंत गतिशील व वक्तशीर होती. त्यामुळे दर शनिवार रविवारी पहाटे पासुनच त्यांचा झंजावात शहरामध्ये व तालुक्यामध्ये पहायला मिळत होता. अनेक विभागाचे अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारि, मुख्याधिकारी, पोलिस प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी दादांच्या अवतीभोवती असायचेच. त्यांना पहाटेच सर्व तयारीने दादांच्या बंगल्यावर हजर रहावे लागायचेच. कारण दादा जनतेच्या विविध कामासंदर्भात कधी कोणाला हाक मारतील सांगता येत नव्हते. त्यामुळे दादांचा प्रचंड अंकुश व आदरयुक्त वचक प्रचंड प्रमाणात होता हे सर्वाना चांगलेच माहिती आहे.
परंतू सध्या अशी परिस्थिती आहे का प्रशासनाची कि त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे ? त्यांच्यावर कुणाचाच अंकुश राहिला नाहि. शनिवार रविवार साठी ना रात्री लवकर झोपुन पहाटे ऊठुन पळावे लागत नाही दादांबरोबर. त्यामुळे नागरिकांमध्ये खुप चर्चा पाहण्यास मिळत आहे कि, दादा होते तेव्हा पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी कर्मचारी तातडीने कारवाई करायचे पण कोणी आता तेवढी तत्परता दाखवताना दिसत नाही नागरिकांच्या मूलभूत समस्या बाबतीत.
वाहतूक पोलिसांचा फक्त वाहन चालकांवरच कारवाईचा बडगा बेशिस्त अतिक्रमणाबाबत मात्र डोळेझाक:
बारामती शहरात सध्या खुप गंभीर समस्या आहेत. वाहतूक नियंत्रणाच्या बाबतीत तर काय बोलायचीच सोय राहीली नाही. पोलिस प्रशासनाकडून दैनंदिन कोणतेही ठोस कारवाई किंवा वाहतूक नियंत्रण होताना दिसत नाही. सर्व वाहतूक रामभरोसे आहे का? असा सवाल नागरिक करत आहेत. रस्त्यावर थोडीजरी गाडी बाहेर असली कि, वाहतूक पोलिस तत्काळ दंड करतात नागरिकांचे ऐकून पण घेत नाही. पण गाडी रस्त्यावर का आली याचा विचार कोण करणार? सार्वजिक वाहन तळावर हातगाडे व छोटे व्यवसायिक हे कामा पुरती जागा न घेता बेमालुमपणे अतिक्रमण करत आहेत. दुचाकीवाल्यांना गाडी लाऊन दिली जात नाही त्यांच्याबरोबर प्रचंड वादावादी होताना नित्य नेमाचीच घटना दिसत आहे.
नगर परिषद प्रशासन अतिक्रमण विभाग फक्त नावालाच का? नागरिकांमध्ये नाराजी?
वाहतुकी संदर्भात पोलिसांबद्दल नाराजी असू शकते पण शहरातील प्रचंड प्रमाणीतील अतिक्रमणाबाबत पोलिस प्रशासनातील अधिकार्यांना संपर्क केला असता अतिक्रमणचा विषय नगर परिषदचा आहे त्यांना संपर्क करा असे उत्तर महाराज्य टाईम्स प्रतिनिधीला मिळाले. मुख्याधिकारी यांना वस्तुस्थिती फोटोसह मेसेज करुन पाठवली पण मुख्याधिकारी यांच्याकडून संबधित विभागाला सुचना देऊन कारवाई करण्यास सांगितले का नाही हे अजून कळायला मार्गच नाही.
मुख्याधिकारी हे जनतेच्या कर रुपी पैशातून दरमहा लाखो रुपये पगार घेतात पण जनेतच्या मूलभूत प्रश्नांसाठी कधीच रस्त्यावर किंवा नागरिकांच्या अडचणी बघण्यासाठी त्या त्या परिसरात फिरताना वास्तविकपणे कुणाला दिसलेच नाहीत जे त्यांनी करायला पाहिजे. ते फक्त अधिकारी कर्मचार्यांचे मुख्य म्हणून वावरताना दिसतात का ? जनतेचा पगार घेणारे जनतेचे नोकर असुन ते अतिक्रमण व इतर समस्यांकडे दुर्लक्ष का करतात? असा संतप्त सवाल नागरिकांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना केला आहे.
बारामती शहरात बेकायदेशीर अतिक्रमणाने अक्षरशः विळखा घातला आहे अशी परिस्थिती आहे. सर्वात जास्त गुनवडी चौक ते इंदापूर चौक, गुनवडी चौक ते गांधी चौक अत्यंत गंभीर समस्या असुन वाहतुकीची प्रचंड कोंडी रोजच दिसून येते त्यातूनच अनेक वादांचे प्रसंग होत आहेत. रस्तालगत असलेल्या दुकानादारांनी डांबरी रस्त्यावर दुकानातला माल मांडला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी जास्त होत आहे. गुनवडी चौक परिसरात तर दुचाकी वाहन लावायला सुद्धा जागा फुटभर सुद्धा नसते. कारण हातगाडीवाल्यांचे प्रचंड अतिक्रमण. हातगाडीवर व्यवसाय करण्यास कुणाचेही दुमत किंवा त्रास नाही. पण हातगाड्याभोवती चारीबाजुस मालाचे बाॅक्स लाऊन जागा अडवली जाते व इतरांना गाड्या लाऊ दिल्या जात नाहीत. मग गाड्या रस्त्यावर येतात आणि त्याचाच फायदा घेऊन पोलिस कारवाई करतात.
बारामती शहर बेकायदेशीर वाहतुकीस अडचण होईल असे अतिक्रमण मुक्त होईल का? असा संतप्त सवाल नागरिक त्या परिसरातील नगरसेवक, मुख्याधिकारी व पोलिस प्रशासनास प्रखरपणे विचारत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा