पाऊसामुळे एसटी स्टँडवर चिखल घाणीचा प्रचंड राडा !! बारामतीच्या नेते, डेपो मॅनेजरनी लोकांचा त्रास बघायला वेळ तरी काढा ? प्रवाशांचा प्रचंड रोष
बारामतीः दि. ०१ डिसेंबर २०२३
बारामती शहरात कसबा येथे तात्पुरते केलेले एसटी बसस्थानकात प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास सोसावा लागत असल्याचे दिसुन आले आहे. स्वच्छ सुंदर बारामतीत प्रवाशांचे हाल होत आहेत. "प्रवाशांच्या सेवेसाठी" ब्रीदवाक्य ठरले खोटे?
बारामतीचे विकास पुरुष उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी रविवारी थोडा वेळ काढा !! तिकिटाचे पूर्ण पैसे भरून होणारा लोकांचा त्रास बघायला एकदा तरी या ??
-- सर्व प्रवाशांचा प्रचंड रोष !!
बारामतीत विमानतळासारखे प्रचंड भव्य व सुंदर असे एसटी बसस्थानक नागरीकांच्या कष्टाच्या पैशातुन करोडो रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाल्यापासुन पर्यायी जागा म्हणून कसबा येथे कै.गुलाबराव ढवाण पाटील चौकात सुरू करण्यात आले होते. नवीन बस स्थानकाचे काम अनेक महिन्यांपासुन सुरू असुन कधी पुर्ण होईल याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. कारण तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या कसबा येथील बसस्थानकामुळे बारामती शहरातील लोकांना कसबा येथे सोय झाली खरी पण जाण्या येण्याचा त्रास तर आहेच पण इतर गोष्टींमुळें सुध्दा नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसुन आले.
तसेच मोठ मोठे खड्डे झाले आहेत त्यांना परत भरण्यात आले नाही. सतत पडणार्या पाऊसामुळे स्टँडवर अतिशय चिखल साठलेला असुन मोठमोठे खड्डे घाण पाण्यामुळे भरले आहेत. अनेक वयस्कर महिला, व इतर प्रवासी चिखलात घसरुन पडल्याचे दिसुन आले आहे. अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व स्टॉल धारक व रिक्षा चालकांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना दिली. सर्व एसटी बस उत्तर दिशेला तोंड करून उभ्या राहतात त्यामुळे प्रवांशांना बस आली की, गावाची पाटी बघण्यासाठी पटांगणातच उभे रहावे लागत आहे. बसण्याची पत्रा शेड पश्चिमेला असल्याने ती लांब आहे. त्यामुळे तिथुन गाडयांचे बोर्ड दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना गाडीच्या समोरच उभे रहावे लागत आहे,
बसस्थानकात स्वच्छतागृह करण्यात आले परंतू ते पत्रा शेडमध्ये बनविले आहे. अत्यंत घाणेरडी अवस्था त्यामध्ये झाली आहे. पाय ठेवेल तिथे चिखल आणि घाण साठली आहे. महिलांना सुरक्षीतता तर अजिबातच नाही. पत्रे फाटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहाच्या भोवती संपूर्ण घाणीचे साम्राज्य आहे. त्याकडे स्थानक प्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाने कशासाठी ठेवले आहे हा एक फार मोठा प्रश्न पडत आहे. त्याचे अत्यंत प्रखर उदाहरण म्हणजे आपण घरी असताना एसटी ची चौकशी करायला स्टॅण्डवर फोन केला तर लॅण्डलाईन अजिबात लागत नाही. पोहचू शकत नाही किंवा व्यस्त आहे आणि हा नंबर अस्तित्वात नाही अशी वाक्य फोनवर ऐकायला मिळतात. त्यामुळे नागरीकांना स्टॅण्डवर आल्यावरच कळते की, गाडी आत्ताच निघुन गेली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडया चुकल्यानंतर परिवारासह प्रवास करणार्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
'' अशा घटनेची शहनिशा करण्यासाठी महाराज्य टाईम्सचे प्रतिनीधी बसस्थानकात चौकशी ऑफीस (कंट्रोल रूम) ला गेले असता. असे दिसून आले की, केबीन मधील कर्मचार्यांनी फोनचा रिसीव्हर बाजूला काढून ठेवला आहे. म्हणजे कुणी फोन केलातर रिंग वाजायचा प्रश्नच नाही आणि नागरीकांना माहिती देण्याचा त्रासच नाही. अशी ही विकसीत बारामतीच्या नागरीकांना असुविधा. स्टॅण्डवर फोन केल्यावर न लागणे हे कायमचेच आहे असे अनेक प्रवांशानी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगीतले.''
स्टॅण्डवरील होणार्या त्रासासंबधी काही एसटी कर्मचार्यांना चौकशी केली असता त्यांनी डेपो मॅनेजरला विचारा किंवा पुणे विभागीय नियंत्रक यांना विचारा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. सध्याचे पुणे विभागीय नियंत्रक हे पुर्वी बारामतीत डेपो मॅनेजर होते त्यांचे प्रमोशन होऊन ते त्या पदावर आहेत मग ते कधी हया असुविधा बघायला येतात का? असे काही एसटी कंडक्टर व ड्रायव्हर यांना विचारले असता नाव न सांगण्याच्या अटीवर उत्तर दिले की, ‘‘विभागीय नियंत्रक राजकिय पक्षाचे काम सुध्दा करतात ज्यावेळेस पक्षाचा काही कार्यक्रम असेल तर ते येतात, नाही तर आमच्याकडे किंवा स्टॅण्डकडे बघायला त्यांना वेळ नसतो ’’ अशी तिखट प्रतिक्रीया ऐकायला मिळाली.नवीन करोडो रूपये खर्च करून विमानतळासारखे निर्माण केलेले एसटी स्टॅण्ड होईल तेव्हा होईल. उदघाटनाच्या बोर्डवर मंत्री, शासकिय अधिकारी, स्थानिक पुढारी नेते व विभागीय नियंत्रकाचे नांव झळकेल पण प्रवाशांना होणार्या त्रासाकडे कोण बघणार असा सवाल विकसीत बारामतीकर नागरीक करत आहेत.
'' डेपो मॅनेजर एम.आय.डी.सी. वर्कशाॅपमध्ये बसतात त्यांना स्टँडवर यायला कदाचित वेळ मिळत नसेल. त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कसा कळणार. लाखभर रुपये पगार दर महिना चालू असणार? त्यामुळे येऊन बघायची काय गरज त्यांना वाटत नसेल. आम्हाला वाटले मा. अजितदादांच्या बारामतीत स्वच्छता असेल. पण स्टँडवर घाण बघून व आमचा त्रास बघून खुप राग आला आहे. ''
--- तुकाराम जाधव, जेष्ट नागरिक, अहमदनगर




अतिशय दुर्दैवी अव्यवस्था, तात्पुरते स्थानक सुद्धा किमान सुव्यवस्थित असावे अशीच सामान्यांची अपेक्षा असते. अन्यथा लोक इतर पर्यायांकडे वळून रा.प. चेच नुकसान होणार.
उत्तर द्याहटवासर्व गाड्यांचे वेळापत्रक नियमित करायला हवे... ते लोकांना कळायला हवे.... आजकाल व्हाट्सअप सारख्या माध्यमातून ते सहज प्रत्येकाला मिळेल..... भिगवण रोड ला गाडीत बसल्यावर पुढे पुण्याला जायचे असेल तर बसताना विचारावे लागते की गाडी स्टॅंडवर जाणार आहे की पंपा वर डिझेल भरायला.... नाहीतर पम्पवर वीस तीस मिनिटे जातात म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था होते.... पुढे लांब पल्याची गाडी निघून गेलेली असते 🙏🙏
उत्तर द्याहटवा