बारामतीत पुतण्या युगेंद्र पवार आव्हान देणार ?, 64 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे ?
महाराज्य टाईम्स: (२३ आँक्टो) गेली अनेक दिवस राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार आहे.
दरम्यान काही दिवसांपासून अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. त्यांचे सुपुत्र जय पवार हे मतदारसंघातून उभे राहतील अशा चर्चा सुरू होत्या. पण या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांसह सुनील तटकरेंनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे आता बारामतीमधून मविआतून उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी निवडणुकीच्या घोषणा होताच. शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता 64 वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार बंधू एकमेकांच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
युगेंद्र पवारांच्या मागे पवार कुटुंब
श्रीनिवास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नीदेखील अजित पवार यांच्याविरोधात टीका करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवला आहे. लोकसभा निवडणुकीच्सया प्रचारात त्यांनी मोठी आघाडी घेतली होती. यातच बारामतीमध्ये त्यांच्या नावाचे फिक्स आमदार असे बॅनर पहायला मिळाले. यासह पवार कुटुंबियांकडून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवारांसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
श्रीनिवास पवारांनी साधला अजितदादांवर निशाणा
खरं म्हणजे अजितदादा पवार नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो. मी जे बोलतो तसेच करतो, असे ते नेहमी म्हणतात. ते जर खरंच शब्द पाळणारे असतील तर ते निवडणुकीला उभे राहणारही नाही, सांगता येत नाही असे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.
शर्मिला पवारांची अजित पवारांवर टीका
श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या घरात वडीलधारी माणसे आहेत. आपली ओळख शरद पवार यांच्यामुळेच आहे. साहेबांनी आपल्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारणे म्हणजे आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले? असे विचारण्यासारखे असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे. शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासूनच सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात माती खाल्ली का? आपण त्याला कारणीभूत होऊयात का? आपण त्याला गालबोट लावायचे का? असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. कोणाला यश मिळेल हा मुद्दा नसून केवळ साहेबांना विजयी करायचा आहे, हा मुद्दा असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे.
युग्रेंद्र पवार फिक्स आमदार: बारामतीत बॅनरबाजी
बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात. युगेंद्र पवार हे तीन वर्षांपासून महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शरद पवार यांच्या सूचनेनुसार सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती उत्पादकांचे अनेक वेळा मेळावेही घेण्यात आले होते.
शरद पवारांनी केला भावाविरोधात प्रचार
1960 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होती. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शेकापने शरद पवार यांच्या मोठ्या भावाला म्हणजे वसंतराव पवारांना उमेदवारी दिली. अन् शरद पवारांनी काँग्रेसला मदत करताना भावच्या विरोधात प्रचार केला. या निवडणुकीत वसंतराव पाटील यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे गुलाबराव जेधे विजयी झाले.
शरद पवार त्यांच्या पुस्तकात म्हटलंय की, माझा भाऊ काँग्रेसच्या विरोधात उमेदवार होता. सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, मी काय करणार? अवघड परिस्थिती होती. भाऊ वसंतरावांना माझी अडचण समजली. त्यांनी मला फोन करून सांगितले, तू काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहा. माझ्या विरोधात प्रचार करायला अजिबात संकोच करू नको. त्यावेळी सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात संयुक्त समितीचे वातावरण होते. या निवडणूकीत बंधू शेकापचे उमेदवार असल्याने माझी कुचंबणा झाली त्यानंतर मी माझे आयुष्य काँग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचारात वाहून घेतले आणि गुलाबराव जेधे विजयी झाले.
अजित पवारांचा राजकीय प्रवास
अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे असून त्यांची महाराष्ट्रातील राजकारणात चांगली पकड आहे. ग्रामीण भागातील चांगली जाण असलेला तसेच तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच झाले.
त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर 1991 ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्याबरोबरच याच वर्षाच्या जून ते सप्टेंबर दरम्यान त्यांनी लोकसभेच्या निवडणूकीत आपला झेंडा गाडला आणि खासदार बनत संसद गाठली. त्यानंतर अजित पवारांनी फिरकूनही मागे पाहिले नाही.
अजितदादांनी सोडली काकांसाठी खासदारकी
1991 च्या काळात शरद पवारांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजेच अजित पवार हे राजकारणात सक्रीय झाले. 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 या कालावधीत ते लोकसभेत खासदार होते. 1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी. व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले. अजित पवार त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, आणि 2014, 2019, असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा