हळदी-कुंकू व मराठी भाषा संवर्धनाचा अनोखा संगम !! मोहोळमध्ये संस्कृतीचा उत्सव! !
मोहोळ, दि.२४ (महाराज्य टाईम्स) : मोहोळ येथील व्यापारी मोफत वाचनालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मोहोळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी-कुंकू व मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. महिलांचा सन्मान, पारंपरिक मूल्ये आणि मातृभाषेप्रती असलेली निष्ठा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, व्यापारी मोफत वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुधीर जोशी, नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, नगरसेविका साखराबाई बरकडे, क्षमा बारसकर, राजन घाडगे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्योत्सना जोशी, दत्तात्रय कुलकर्णी, गौतम क्षीरसागर, शहाजहान बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत राजन घाडगे यांनी हळदी-कुंकूच्या परंपरेचे महत्त्व अत्यंत भावपूर्ण शब्दांत विशद केले. “हळदी-कुंकू हा केवळ धार्मिक विधी नसून तो आपल्या संस्कृतीचा, स्त्रीशक्तीचा आणि आपुलकीच्या नात्यांचा उत्सव आहे. अशा पवित्र व आनंदी प्रसंगी मराठी भाषा संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर विभूतींनी मराठी भाषेला दिलेल्या वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक समृद्धीचा उल्लेख केला. तसेच व्यापारी मोफत वाचनालय हे वाचनसंस्कृती जपण्याबरोबरच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने मोलाचे कार्य करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व, वाचनाची गोडी निर्माण करण्याची गरज आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याची सामाजिक जबाबदारी यावर प्रकाश टाकला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिकच स्नेहपूर्ण व उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल दिलीप देशपांडे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले, तर पूनम शिंदे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना तीळ-गूळ व वही पेन वाटप करण्यात आले, ज्यामुळे सणाचा गोडवा अधिकच वाढला.
हा कार्यक्रम म्हणजे परंपरा, संस्कृती आणि मराठी भाषेप्रती असलेल्या प्रेमाचा जिवंत प्रत्यय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा