राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर अध्यक्षपदी किरण इंगळे यांच्या निवडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला शिक्कामोर्तब
बारामती (महाराज्य टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष बारामती शहर अध्यक्षपदी किरण किसनराव इंगळे यांच्या नावाला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी पहिली पसंती देत शिक्कामोर्तब केले.
किरण इंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांची आई कै. बायडाबाई इंगळे यांनी बारामती नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक पद तब्बल १५ वर्षे भूषविले होते. मोठे बंधू शाम इंगळे हे माजी नगरसेवक २०१६ पर्यंत होते. त्यांव्या मितभाषी स्वभावामुळे बारामती नगरपरिषदेत आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. इंगळे कुटुंब सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत आलेले आहेत. इंगळे कुटुंबाचे बारामतीतील व्यापारी वर्गाशी विश्वासार्हता आहे. त्यामुळे इंगळे कुटुंबाची व्यापारी वर्गात वेगळी प्रतिमा आहे. पवार साहेबांच्या राजकारणापासून हे कुटुंब पवारांशी एकनिष्ठ आहेत. पवार कुटुंबाचा विश्वासही तेवढा इंगळे कुटुंबावर आहे.
किरण इंगळे यांना हुशार, अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी अत्यंत क्रियाशीलपणे भुषविले आहे. मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले. जनसंपर्क अत्यंत चांगला असल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विषयी नेहमीच आपुलकीची व आदराची भावना आहे. त्यामुळे निवड झाल्यामुळे सर्वात जास्त आनंद व जल्लोष आबा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. इंगळे यांनी निवड झाल्यावर पदभार स्विकारला व पहिले काम म्हणजे आबा गणपतीचे मनोभावे दर्शन करुन कार्यकर्त्यांबरोबर आनंद साजरा केला.
शहराध्यक्ष पदाची जबाबदारी उद्यापासून सांभाळण्याचे आदेश मिळाले आणि आज लगेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकविण्याचा सन्मान किरण इंगळे यांना मिळाला हा एक योगायोग घडला. निसंकोच किरण इंगळे या पदाला उत्तम न्याय देतील यात शंका नाही.
शहराध्यक्षपद किरण इंगळे यांना मिळू नये म्हणून पक्षातील काही लोकांनी ना.अजित पवार यांना किरण इंगळे यांची प्रतिमा मलिन आहे. अनेक कायदेशीर प्रकरण आहेत असे सांगितले असल्याचे कळाले. त्यामुळे मागील आठवड्यात निवडीचे पत्र देऊनही किरण इंगळे यांना पदभार घेण्यासाठी थांबवले होते. पण आता संपूर्ण चौकशी केल्यानंतर अजित पवार यांनी निवडीवर शिक्कामोर्तब केला आहे.
किरण इंगळे यांचे कार्य म्हणजे सर्वसमावेश आहे. सर्वांनाबरोबर घेऊन काम करणारे ते आहेत. सध्या बारामती शहरात कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचे काम करण्याची गरज आहे. किरण इंगळे हे तळागळातून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. बारामती शहराचा विशेषतः गल्ली बोळाचा गाढा अभ्यास त्यांना आहे. नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी अनेक प्रभागात अभ्यासपूर्ण काम करुन उमेदवारांना कसे मताधिक्य जास्त पडेल याविषयी खुप उल्लेखनीय काम केल्याचे दिसून आले आहे.
एकंदरीत पक्षाअंतर्गत कुरघोड्यावर मात करत त्यांची निवड पक्षश्रेष्टिंनी केली असल्यामुळे सगळ्यांच्या खेळ्यांना पूर्णविराम बसला आहे हेच यातुन अधोरेखित होत आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व महत्वाच्या पदांवर म्हणजेच नगराध्यक्षपद, तालुकाध्यक्षपद, शहराध्यक्षपद, युवकाध्यक्षपद व विविध समित्यांची सभापतीपद, विविध संस्थांची प्रमुखपदी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने संधी देण्यात आली आहे. बहुजनांना डावलले आहे अशी काही पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी मनातली खदखद महाराज्य टाईम्सशी बोलताना भावना व्यक्त केली.
राष्ट्रवादी पक्षाची राजकिय धुरा आता दोन किरण नावाचे व्यक्ती संभाळणार असे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. दोन तेजस्वी किरणांमुळे पक्षाची प्रतिमा किती उजाळून निघेल हा येणारा कार्यकाळच दाखवेल.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा