अजितदादा अनंतात विलीन: बारामतीत प्रत्येक घरात दु:खाचे सावट! उद्या शोक सभा


बारामती:(महाराज्य टाईम्स) भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले. त्यांच्या पार्थिवावर काल बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी 'अजित पवार अमर रहे', 'अजितदादा परत या' 'एकच वादा अजितदादा' या अशा विविध आर्त घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.
योगायोगाने अजितदादा अनंतात विलीन म्हणताना त्यांचे वडिलांचे नाव सुद्धा अनंत च होते.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी एका विमान अपघातात अकाली निधन झाले. ते मुंबईहून बारामती येथे प्रचारासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. पण धावपट्टीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर त्यांचे विमान कोसळले आणि महाराष्ट्राचा एक कर्तबगार राजकारणी जागेवरच काळाच्या पडद्याआड गेला. अजित पवारांसह 5 जणांचे या दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यानंतर काल सकाळी अजित पवारांचे पार्थीव प्रथम काटेवाडी या त्यांच्या मूळगावी नेण्यात आले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तेथून ते बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आले. तिथे असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने ,"अजित पवार अमर रहे"चा जयघोष करत आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांवरील अखंड प्रेमाची साक्ष देत होता. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात एक चबुतरा उभारण्यात आला होता. या चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्याच्या शेजारील मंडपात शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, शाहू महाराज छत्रपती, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक लहानथोर नेते उपस्थित होते.

पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अविरत काम

उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार राज्याच्या राजकीय वर्तुळात कामाचा माणूस म्हणून परिचित होते. ते भल्या पहाटे उठून आपल्या कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जनतेच्या समस्या सोडवत राहायचे. राज्यातील जनता त्यांच्याकडे केवळ एका नेता म्हणून नव्हे तर आपला आधार, आपला दादा म्हणून काम पाहत होते. राज्याच्या राजकारणात मागील साडेचार दशकांपासून त्यांनी आपला शब्द 'खरा' करून दाखवला. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला आज आबालवृद्धांपासून महिलांपर्यंत हजारोंचा जनसमुदाय जमला होता.

उद्या ३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शोकसभा
           महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठिक ९.३० वा. राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, शारदा प्रांगण, भिगवण चौक येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे..
           या शोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व  नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थेचे, सेलचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, बूथ कमिटीतील सर्व पदाधिकारी, समन्वयक, युवक , महिला पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, डॉक्टर, वकील, सर्व व्यावसायिक व व्यापारी वर्ग, पत्रकार बंधू, सर्व सामाजिक कार्यकर्ते, तसेच सर्व बारामतीकर यांना उपस्थित राहण्याची विनंती शहराध्यक्ष अँड.किरण इंगळे व महिला अध्यक्ष सौ.अनिताताई गायकवाड तसेच अभिजित घाडगे, शहर युवक अध्यक्ष यांनी बारामतीकरांना केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक