महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री म्हणुन सुनेत्रा अजित पवार यांचा आज सं. ५ वां. शपथविधी
बारामती:(महाराज्य टाईम्स) स्व.अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील. शनिवारी दुपारी 2 वाजता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली. सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. तिथे दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे महिला वर्गाचा देखील येत्या काळात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदावर महिला चेहरा असणे एवढे देखील महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना पाठबळ देते. त्यामुळे ही बाजू देखील मजबूत ठरत आहे.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षाचे नेते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचलेत. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे उपस्थित आहेत. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले. प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री ही माहिती आता राज्यपालांना कळवतील. त्यानंतर शपथविधी होईल.
लोकभवनात 13 महिने आणि 26 दिवसांनंतर शपथविधी सोहळा
महाराष्ट्राच्या लोकभवनात शेवटचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी झाला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती. आता, 13 महिने आणि 26 दिवसांनंतर, अजित यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा त्याच लोकभवनात शपथविधी होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजभवनातल्या लोकभवात दुपारी साडेचार वाजता बोलावण्यात आले आहे. येथेच सुनेत्रा पवार सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित असतील.
महिलांच्या रोजगारासाठी टेक्सटाइल पार्क
सुनेत्रा पवार यांना पर्यावरणाची तसेच स्वच्छतेची आवड आहे. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी बारामती येथे एन्व्हायरनमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडीत काम करत आल्या आहेत. महिलांना रोजगार मिळावा यासाठी सुनेत्रा पवारांनी टेक्सटाइल पार्कची सुरुवात केली. या पार्कमध्ये हजारो महिलंनया रोजगार उपलब्ध झाला आहे. 2006 पासून या पार्कचे अध्यक्षपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. याचसोबत विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही त्या विश्वस्त म्हणून काम करत आहेत.
दांडगा राजकीय वारसा
सुनेत्रा पवार या धाराशिवचे नेते स्व. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत, तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या त्या आत्या लागतात. धाराशिवच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचा चांगलाच दबदबा होता. त्यांचा वारसा राणाजगजितसिंह पाटील पुढे नेत आहेत. सुनेत्रा पवार या नेहमी सांगतात की, राजकारण आणि सामाजिक कार्याबद्दलची त्यांची आवड त्यांच्या वडिलांकडून आली आहे. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि गावातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी हेही सांगितले की, त्यांचे बालपण घराघरात जाऊन लोकांना भेटत, त्यांच्याशी संवाद साधत गेले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार या पवार घरण्याशी जोडल्यानंतर पुन्हा राजकारण अगदी जवळून त्यांना अनुभवता आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा