उपमुख्यमंत्रि सुनेत्रा पवार यांचा आज पहिला कराड दौरा: स्व.यशवंतराव चव्हाण समाधीचे घेणार दर्शन
महाराज्य टाईम्स: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात ज्या विचारांचे स्थान सर्वोच्च होते, तोच 'यशवंतराव चव्हाण' यांच्या विचारांचा वारसा आता त्यांच्या पत्नी आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे चालवताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार पहिला दौरा सातारा जिल्ह्यातील कराड आणि फलटणला असणार आहे. सकाळी कराडच्या प्रीतीसंगम येथे जाऊन त्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत.
अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कराडचे प्रीतीसंगम आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा नेहमीच प्रेरणास्थान राहिली. महत्त्वाच्या राजकीय निर्णयांपूर्वी किंवा संकटाच्या काळात अजितदादांनी नेहमीच या समाधीस्थळी नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवली होती. आपल्या भाषणांमधूनही ते 'चव्हाणसाहेबांची विचारसरणी' हाच आपला आधार असल्याचे सांगायचे. आज सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात प्रीतीसंगमावरून करून, आपण दादांचा हा वैचारिक वारसा सक्षमपणे पुढे नेण्यास सज्ज आहोत, असाच संदेश दिला आहे.
असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम
सकाळी १०:०० वाजताः कराड येथील प्रीतीसंगम बागेत
आगमन आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन.
सकाळी ११:००
वाजताः मोटारीने फलटणकडे रवाना.
दुपारी १:०० वाजताः लोणंद-तरडगाव (ता. फलटण) येथे विदीप जाधव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट.
विदीप जाधव यांच्या कुटुंबाची घेणार भेट
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. अजित पवारांची सावलीसारखी साथ देणाऱ्या विदीप यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होण्यासाठी सुनेत्रा पवार त्यांच्या घरी जाणार आहेत. कालच आमदार रोहित पवार यांनी विदीप यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर आज खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कुटुंबाला आधार देण्यासाठी पोहोचत आहेत.
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शपथविधीनंतरचा त्यांचा हा पहिलाच सातारा दौरा असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा