शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सोडणार नाही : उपमुख्यमंत्रि सुनेत्रा पवार
महाराज्य टाईम्स: महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे भव्य शासकीय सोहळा पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच शासकीय व्यासपीठावरून मनोगत व्यक्त केले. भाषण करताना त्या भावुक झाल्याचे दिसून आले. राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव. शिवरायांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचे बळ आम्हा सर्वांना दे, अशी प्रार्थना त्यांनी आई शिवाई देवीच्या चरणी केली. शिवनेरीवर यापूर्वी अनेकदा वंदनासाठी आल्याचे सांगत त्यांनी आजचा दिवस विशेष आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे नमूद केले.
नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शपथ घेताना त्यांच्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊंनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याची प्रेरणा आणि संकटांशी सामना करण्याची ताकद दिली. तीच प्रेरणा आजही मार्गदर्शक आहे, असे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या जन्मभूमीवर बोलताना अंगावर काटा आला असल्याचे त्यांनी व्यक्त केले. आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत, ही भावना त्यांनी अधोरेखित केली.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रतिज्ञा केली. आदरणीय दादांनी ज्या विचारांवर आयुष्यभर वाटचाल केली, तो वारसा मी कधीही सोडणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी अजित पवारांचा उल्लेख करत सांगितले की, या शिवनेरी किल्ल्याबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. शिवनेरीच्या सुशोभीकरणासाठी ते प्रयत्नशील होते. मागील अर्थसंकल्पात आग्रा, संगमेश्वर, रायगड आणि वढू बुद्रुक येथे कामांना त्यांनी चालना दिली होती. या ठिकाणी भावी पिढीला प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
महायुती सरकार प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या भाषणात भावनिक सूर आणि कर्तव्यभावना यांचा संगम दिसून आला. त्यामुळे उपस्थितांमध्येही एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्याचे जाणवले.
जन्मस्थळी नतमस्तक होत महाराजांना अभिवादन
शिवजयंतीच्या या सोहळ्याने शिवनेरी पुन्हा एकदा ऐतिहासिक आणि भावनिक वातावरणाने भारावून गेले. हजारो शिवभक्तांनी जन्मस्थळी नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केले. पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद, फुलांची सजावट आणि रोषणाईमुळे संपूर्ण गड मंगलमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प या जयंतीदिनी पुन्हा एकदा दृढ करण्यात आला.
पाळणा जोजवत जन्मोत्सव साजरा
मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा जोजवत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक विधींसह कार्यक्रम पार पडला. पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांनी महाराजांना अभिवादन केले. पहाटेपासूनच गडावर शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शिवजन्मस्थळ आणि गडाचा परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. ऐतिहासिक वारसा जपत विद्युत रोषणाईने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता. या मंगलमयी सोहळ्याला राज्यभरातून हजारो नागरिक उपस्थित राहिले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा