बारामती नगर परिषद अँक्शन मोडवर: संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी तयारी
महाराज्य टाईम्स (बारामती):
जगदगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात मुक्कामी येत असते त्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी ही माहिती दिली.
पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगर परिषदेने वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे, रस्त्यावरील खड्डे, गतिरोधक दुरूस्ती व वाढलेली झाडे झुडपे काढण्यात येत आहेत. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे, आणि मोबाईल शौचालयांची व्यवस्था असलेल्या सर्व परिसरांची तात्काळ स्वच्छता करून जागा उपलब्ध करण्याचे काम होत आहे.
सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू आहे. लाखॊं भाविकांचे आरोग्य, पिण्याचे पाणी व मुक्कामाची सोय याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भुसे यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
यासोबतच शहरात निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे व बीएचसी पावडर फवारण्यात येत आहे. दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक औषधांचीही फवारणी केली जात आहे. रस्त्यांवर साचलेला गाळ व कचरा हटवून अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सहाय्याने रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात येत आहेत.
बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे व सर्व विभाग प्रमुख यांनी शहरातील पालखी मार्गाची पायी चालत पाहणी करुन बारीकसारीक अडचणींवर बारकाईने लक्ष देऊन तातडीने दुरुस्त करण्याच्या सुचना संबधित कर्मचार्यांना दिल्याचे दिसून आले. पाकळीच्या मार्गावरील अनावश्यक वाढलेले वृक्ष किंवा दुभाजकांमधील छोटी झाडे यांची छाटणी (ट्रिमिंग) योग्य पद्धतीने करण्यात आली आहे.
सदर व्यवस्थापन करण्यासाठी प्रामुख्याने मुख्याधिकारी पंकज भुसे, आरोग्य विभाग प्रमुख स्वरूप अहिवळे, आरोग्य निरिक्षक अजय लालबिगे, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय प्रभुणे, विद्युत व पाणीपुरवठा विभाग प्रमुख अक्षय नरे, उद्यान विभाग प्रमुख श्रीमती योगिता दरेकर व भंडार विभाग प्रमुख सचिन शहा यांनी सहभाग घेतला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा