बारामतीत स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद..!


एकूण १,४५६ रक्तदात्यांचे रक्तदान; समाजसेवेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग..


महाराज्य टाईम्स दि. १९ : 
      दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शारदा प्रांगण व विद्या प्रतिष्ठान या दोन केंद्रांवर पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १,४५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली. यामध्ये विद्या प्रतिष्ठान येथे २१७ तर शारदा प्रांगण येथे १,२३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर दरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार यांनी भेट दिली.

     शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींची संख्याही लक्षणीय होती. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय राहिल्याने संपूर्ण परिसर समाजसेवेच्या वातावरणाने भारावून गेला.

     यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जयदादा पवार, पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळेकर, नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी पुणे जिल्हाध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, प्रसिद्ध व्यापारी किशोर सराफ, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, दूध संघाचे चेअरमन किशोर फडतरे, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय पथके आणि विविध रक्तपेढ्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, वैद्यकीय पथके, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजहिताचे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
      स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरातून समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आला. एकाच दिवशी १,४५६ रक्तदात्यांनी केलेले रक्तदान अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे


"" महिनाभर सामाजिक उपक्रमांची मालिका
दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने बारामतीमध्ये महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महारक्तदान शिबिर हा त्यातील प्रमुख उपक्रम ठरला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा स्व. अजितदादा पवार यांच्या समाजसेवेच्या विचारांवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या वतीने ११ हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून आगामी काळातही समाजोपयोगी उपक्रमांची मालिका सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ""

  -ॲड. किरण इंगळे - शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जामदार रोड, बारामती येथील दिग्विजय झणझणे याने केला सख्ख्या शेजारी दाम्पत्याचा खुन-- पोलीसांची उत्तम कामगिरी -आरोपी अटक

नगरपालिका निवडणुका स्थगित, नवीन कार्यक्रम जाहीर मतदान आता २० डिसेंबर ला

बारामती शहरात पैसे देऊन व दमदाटी करून मतदान विकत घेतले जात असल्याची तक्रार दाखल

बारामती पोलिसांची कडक कारवाई: औरंगजेबचा फोटो स्टेटस ठेऊन धार्मिक तेढ निर्माण करणार्याला अटक करुन केली येरवडा जेलमध्ये रवानगी !!

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जाणार !! "अदानी" कंपनी बारामतीत मीटर बसवणार

पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर

तिन हत्ती चौकात भिषण अपघात ! तिनजण गंभीर जखमी- दहा मिनिटात दोन अपघात !

कामाचा नेता गेला अनं प्रशासनावरचा अंकुशच गेला !! शहराला अतिक्रमणाचा विळखा कोण तरी लक्ष देतोय का?

जेष्ठ मुद्रक व्यावसायिक मोतीलाल दोशी यांचा नगर परिषदेबाहेर अपघाती मृत्यू

अँक्टिव्हा गाडी घेऊन देतो म्हणुन बारामतीतील महिलांची केली फसवणूक